‘गृह खातं हातात असल्यानं राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आली, पण..’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असल्याने त्यांना मस्ती आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. पण महाराष्ट्रात आमचा पक्ष सर्वात मोठा आहे, हे लक्षात ठेवा. आज जिथे तुम्ही आहात तिथे उद्या आम्ही असू शकतो, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला आहे.

भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. यावरून राज्यातील राजकारणात वाद सुरु झाले आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत. त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. त्यांनी छोट्या समूहांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला असल्याचे विधान पडळकर यांनी पंढरपूरमध्ये केले होते.

दरम्यान, पडळकर यांच्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गोपीचंद पडळकरांच्या तोंडाला काळे फासण्याचा व चोप देण्याचा इशारा दिला होता. यानंतर भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांनी पडळकरांचे हे वक्तव्य चुकीचे आहे. त्यांच्या मताशी भाजपचा संबंध नसल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यांवर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नीलेश राणे यांनी इशारा दिला आहे. पडळकरांच्या त्या वक्तव्याचे मी समर्थन करत नाही, पण भाजपच्या आमदाराच्या किंवा कर्यकर्त्यांच्या अंगावर कोणी जाणार असेल तर लक्षात ठेवा. आम्हाला धमक्या देऊ नका. जशास तसे उत्तर देऊ, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले होते. याची आठवण नीलेश राणे यांनी करून दिली . त्याशिवाय राष्ट्रवादीवाल्यांकडे गृहखाते असल्याने त्यांना मस्ती आली आहे. पण आमचा पक्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे, हे त्यांनी लक्षात ठेवेवे. आज जिथे तुम्ही आहात तिथे उद्या आम्ही असू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.