‘भाषा नीट करा, नाहीतर तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही’, निलेश राणेंचा अजित पवारांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी खासदार निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर राणे यांनीही त्यांच्या टिकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

सध्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री अडचणीत सापडले आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले असताना नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीकडून अटक झाली आहे. या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली असून भाजपकडून घेरण्याचा प्रयत्न होत आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी जहरी टीका केली होती.

त्यानंतर पुण्यातील सर्किट हाऊस येथे बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का, तसेच त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे विधानही पवारांनी केले होते. पवारांच्या या विधानानंतर आता राणे यांनी राज्यात फार कमी नेते आहेत की ज्यांना अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव घ्यावे लागेल, असे म्हणत अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असे पुन्हा ट्विट करत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. तसेच दुसर, माहिती लपवण निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

मुंडेना मिळाले अभय
धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे. त्यांची पक्षाने नोंद घेतली आहे, असे काल मी स्वत: बोललो होतो. मात्र, आता वेगळे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे.