‘मद्यपींची सोय करण्यात ठाकरे सरकारला जास्त इंटरेस्ट’, निलेश राणे यांचे टिकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यविक्रेत्यांना सुट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. लोकहिताचे निर्णय ठाकरे सरकार घेत नाही. नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन निधी हे सरकार देणार होते. मात्र ते शेतकऱ्यांना अजूनही मिळालेच नाही. पण बेवड्यांची सोय करण्यामध्ये या सरकारला जास्त इंटरेस्ट असल्याची टीका माजी खासदार निलेश राणे (Former MP Nilesh Rane ) यांनी करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील परवानाधारक (अनुज्ञप्ती) मद्यविक्रीची दुकाने बंद होती. या बंद असलेल्या दुकानांचे परवाना शुल्कात सूट देण्याची मागणी होती. त्यानुसार या परवानाधारक मद्यविक्रेत्यांना हे शुल्क भरण्यास सूट देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. मात्र ठाकरे सरकारच्या या निर्णयावर राणे यांनी टीका केली आहे.

कोरोनाच्या काळात प्रभावित झालेल्या मद्यविक्रीच्या दुकानांना दिलासा देण्याबरोबरच, अन्न पुरवठा, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एसईबीसी आरक्षणावर बुधवारी ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत.