‘पवारांना उगाच सगळीकडे आपलं महत्व वाढून घ्यायची सवय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे राठोड गायब झाले आहेत. एकीकडे संजय राठोड प्रकरणात शिवसेचे मंत्री गप्प आहेत. तर दुसरीकडे संजय राठोड आमच्या संपर्कात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. पवारांच्या या भूमिकेवरुन माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

अजित पवारांना शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार का, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यायचा जरी ठरवला तरी, ते पवारांना विचारणार आहेत का, असे म्हणत पवारांना उगाच सगळीकडे आपलं महत्व वाढून घ्यायची सवय असल्याचा असा टोलाही राणे यांनी लगावला आहे.

वनमंत्री संजय राठोड हे माझ्या संपर्कात आहेत. यवतमाळमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्ये संदर्भात माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासोबत अकोला आणि अमरावतीच्याही संबंधित पालकमंत्र्यांशी माझे बोलणेे झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी पोलीस याबाबत संपूर्ण चौकशी करत आहेत. त्यांना त्यांचे काम करू द्या, सत्य काय आहे ते सर्वांसमोर येईलच, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.