एका नोटिशीला एवढं घाबरलात ?, ‘या’ माजी खासदाराचा राऊतांवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सरकारी यंत्रणांच्या मदतीने छळ केला जातो. मात्र, आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही नाव सांगितली तर भाजपच्या नेत्यांना देश सोडून पळावं लागेल, असा निशाणा शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सोमवारी भाजपवर साधला होता. बाईच्या पदराआडून लढण्यापेक्षा समोरासमोर लढा, असे आव्हानही राऊत यांनी भाजपला दिले होते. त्यावरुन भाजपचे नेते माजी खासदार यांनी यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “‘संजय राऊत यांच्यासारखे लोक मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं, ते मैदानात लढण्याची वार्ता करतात. मैदानात आल्यावर त्यांना कळेल ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू’,” असा चिमटाही राणे यांनी काढला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावल्यानंतर भाजप व ईडीच्या कार्यलयाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार पोश्टरबाजी केली. त्यात भाजपच्या नेत्यांना इशाराही देण्यात आला होता. तोच धागा पकडून निलेश राणे म्हणाले, “आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल, असं शिवसेना म्हणते. शिवसेनेनं देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?, असा प्रश्न करतानाच, ‘ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे,” अशी खोचक टीकाही राणे यांनी केली आहे.