शिवसेना नाराज, ‘आता ओबामांच काही खरे नाही,’ नीलेश राणे यांचे खोचक ट्विट

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन -अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकात काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून भारतातील राजकारण रंगले आहे. ओबामा यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधीवर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी मात्र राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. त्यावरून माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी राऊतांना टोला हाणला आहे. ‘आता ओबामांच काही खरे नाही,’ असे खोचक ट्वीट नीलेश राणे यांनी केले आहे.

राऊत यांच्या या नाराजीवर नीलेश राणे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामाला झोप लागत नसेल. आता ओबामाच कसे होणार या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष संयुक्त राष्ट्रसंघाकडे (UNO) धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामाचे आता काही खरं नाही, असं नीलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बराक ओबामा यांचे ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) नावाचे पुस्तक बाजारात आले आहे. त्यात त्यांनी राहुल गांधी हे कमी योग्यतेचे नेते असल्याचे म्हटले आहे. ओबामांच्या या वक्तव्याचा फायदा भाजपचे नेते उठवत असले तरी राऊत यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली होती. ओबामांच्या वक्तव्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. ‘ओबामा यांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला? विदेशी नेते भारतीय राजकारण्यांबद्दल अशी मत मांडू शकत नाहीत. त्यावरून भारतात सुरू असलेेले राजकारणही अयोग्य आहे. ट्रम्प वेडे आहेत असे आम्ही कधी म्हणणार नाही. मुळात ओबामांना भारताबद्दल किती माहिती आहे, असे राऊत म्हणाले होते.