‘या’ माजी खासदाराने शिवसैनिकांना डिवचले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करताना केलेल्या एका वक्तव्यावरुन माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. अनुराग कश्यप याचं वक्तव्य ही सरळ सरळ बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी आहे, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरण व मुंबईबद्दल कंगना राणावत हिने केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना व कंगना यांच्यात वाद सुरु झाला. मुंबईत मला असुरक्षित वाटतं असं वक्तव्य कंगनाने केले होते. त्यानंतर शिवसेनेने तिच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्यास उत्तर देताना कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. सुशांत प्रकरणावरुन कंगनानं बॉलिवूडमधील काही कलाकारांनाही लक्ष्य केलं होतं. सुरुवातीला तिच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या काही कलाकारांनी नंतर तिला प्रत्युत्तर दिलं.

अभिनेत्री व राज्यसभा खासदार जया बच्चन, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला सुनावलं होतं. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी कंगनाला अप्रत्यक्ष उत्तर देताना उद्धव ठाकरे यांचे कौतुक केलं. शिवसेनेबद्दलची माझी मतं बदलली आहेत. शिवसेनेबद्दल माजी जी काही मते होती ती उद्धव ठाकरे यांच्यामुळे बदलली आहेत. मला मुंबईत सुरक्षित वाटतं आणि कुठलीही भीती न बाळगता हवं ते बोलता येतं. महाराष्ट्रात मी आनंदी असल्याचे कश्यप यांनी म्हटले आहे.

अनुराग कश्यप याच्या याच वक्तव्याचा धागा पकडून नीलेश राणे यांनी शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली ? म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती ? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे. हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमूटपणे ऐकून घ्यायचं. असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.