नोकरीच्या बहाण्याने तरूणांची फसवणूक, माजी नगराध्यक्षावर गुन्हा

पाचगणी : पोलीसनामा ऑनलाइन – कोर्टामध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक करणाऱ्या महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षासह एकावर पाचगणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध ३६ तरुणांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे (रा.महाबळेश्वर) व नीलेश रामदास थोरात (रा.शिवाजीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम ढेबे, बाळू गावडे, भगवान राजगे, राहूल कोंढाळकर, युवराज राक्षे या युवकांनी सातारा येथे पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला होता. या अर्जानुसार एकूण ३६ युवकांची फसवणूक झाली असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. पाचगणी पोलीस ठाण्यात शांताराम धोंडिबा ढेबे (वय ४४, रा.कासवंड, ता. महाबळेश्वर) यांनी आखाडे व थोरात यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

शांताराम ढेबे यांनी केलेल्य तक्रारीत म्हटले आहे, मुलगा शुभम याला न्यायालयात क्लार्कची नोकरी लावतो असे सांगून रोख अडीच लाख आणि उरलेले अडीच लाख खात्यामध्ये जमा करण्यास आखाडे यांनी सांगितले. तसेच महाबळेश्वर येथील घरी बोलावून त्या ठिकाणी नीलेश थोरात यांची ओळख करून दिली. त्यावेळी थोरात याने मीच तुमच्या मुलाला नोकरी लावणार असल्याचे सांगितले. थोरात याला अडीच लाख रुपये आणि मुलाची कागदपत्रे दिली. तसेच उर्वरीत रक्कम मुंबतीली दिघी बँकेच्या खात्यात भरण्यास सांगितले. पैसे भरल्याशिवाय नोकरी मिळणार नसल्याचे त्याने सांगितले.

पैसे देऊनही नोकरी लागली नसल्याने ढेबे यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तसेच आखाडे आणि थोरात यांनी अनेक तरूणांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. एन. कापले व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.