साखर कारखान्यावरील अधिकार्‍याच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी आमदारास अटक; शनिवार पर्यंत पोलीस कोठडी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  सातारा जिल्ह्यातील खटाव येथील खटाव – माण ऍग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना वडूज पोलिसांनी अटक केली. दरम्यान या प्रकरणात सात – आठ जणांना यापूर्वीच अटक केली आहे.

वडूज पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यावरील साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून झालेल्या बेदम मारहाणीत जगदीप थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 20 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी सात ते आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी प्रकृतीचे कारण देत उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यांच्या विरुध्द अटक वॉरंट काढले होते. त्यानंतर सातारा येथे वैद्यकीय उपचारासाठी ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना हॉस्पिटलमधून डीस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे. घार्गे यांना वडूज येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवार (दि. 15) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अधिक तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.