राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचं वयाच्या 67 व्या वर्षी कोरोनामुळं निधन

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही यामध्ये होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाशदादा डहाके यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मेहूणे असलेले प्रकाशदादा डहाके यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात गेल्या आठवड्याभरापासून उपचार सुरू होते. त्यानंतर ते कोरोनातून बरे झाले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्हही आला होता. मात्र, आज त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाशदादा डहाके यांच्यावर कारंजा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संघर्षशील नेतृत्व हरपलं : अजित पवार

प्रकाशदादा डहाके यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ‘प्रकाशदादा डहाके यांच्या निधनाने ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेले, शेतकरी, कष्टकरी बांधवांची दु:ख दूर करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे. मी स्वर्गीय प्रकाशदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्वजण डहाके कुटुंबीयांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दांत दु:ख व्यक्त केले.

1995 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रकाशदादा डहाके यांनी पहिल्यांदा 1995 मध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यानंतर 1999 मध्ये पुन्हा निवडणूक लढवली. मात्र, 2004 मध्ये त्यांनी भारिपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आणि आमदार म्हणून निवडून आले.