पाकिस्तानचे माजी PM युसूफ रझा गिलानी यांना ‘कोरोना’ची लागण, एकाच आठवडयात 2 माजी पंतप्रधान संक्रमित

इस्लामाबाद : वृत्तसंस्था –   पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यासंदर्भात पाकिस्तान मीडियाने वृत्त प्रकाशित केलं आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहित खकान अब्बासी यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

शाहिद अब्बासी यांची 9 जून रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्हि आली होती. त्यानंतर आज (शनिवार) युसूफ गिलानी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकाच आठवड्यात दोन माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गिलानी यांनी नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्यूरो म्हणजेच नॅबमुळे कोरोनाची लागण झाली, असा गंभीर आरोप गिलानी यांच्या मुलाने केला आहे.

विशेष म्हणजे नॅबमध्ये गिलानी आणि अब्बासी या दोघांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. त्यामुळे या दोघांना नॅबमध्ये अनेकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याला देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याबाबत आफ्रिदीने स्वत:च ट्विट करून माहिती दिली आहे. शाहीद आफ्रिदीने आपल्या चाहत्यांना स्वत: साठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.