Video : ‘इम्रान खान यांना कोकेन घेताना पाहिलंय’, माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

कराची : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी जलद गोलंदाज सरफराज नवाज (Sarfraz Nawaz) यांनी पाकचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. इम्रान खान कोकेनचे (Drugs) सेवन करत असत असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या धक्कादायक आरोपाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

सरफराज 1970 आणि 80 च्या दशकात पाकिस्तान संघाकडून खेळत होते. त्यांनी इम्रान खान यांच्यासोबतही अनेक सामने खेळले आहेत. जर इम्रान यांनी हा दावा खोटा असल्याचं सांगितलं तर माझ्यावर केस करा असंही सरफराज यांनी म्हटलं आहे. याआधीही पाकच्या माजी क्रिकेटपटूंवर ड्रग्ज घेतल्याचे आरोप करण्यात आले होते.

सरफराज यांचा नेमका दावा काय ?
समोर आलेल्या व्हिडिओत सरफराज यांनी 1987 च्या सामन्याचा उल्लेख केला आहे. हा सामना इग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. सरफराज यांच्या म्हणण्यानुसार, या सामन्यात इम्रान यांची कामगिरी चांगली नव्हती. या घटनेची आठवण करून देत ते म्हणाले, इम्रान इस्लामाबादमध्ये त्यांच्या घरी आले होते आणि जेवताना त्यांनी ड्रग्ज घेतले होते.

नोटमध्ये कोकेन टाकून करायचे सेवन
मुलाखतीत बोलताना सरफराज यांनी सांगितलं, की माझ्यासमोर हा प्रकार घडला. इम्रान खान यांनी माझ्या घरी येऊन 10-20 रुपयांच्या नोटेमध्ये कोकेन टाकून सेवन करायचे. इम्रानसोबत मोहसिन खान, अब्दुल कादिर आणि सलीम मलिकही माझ्या घरी होते. त्यांनीही जेवणानंतर चरसचं सेवन केलं.

कोण आहेत सरफराज नवाज ?
सरफराज नवाज यांनी 1969 ते 1984 पर्यंत पाकिस्तानकडून 55 कसोटी आणि 45 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सरफराज दीर्घकाळ वेगवान गोलंदाजीवर इम्रान खान यांचे साथीदार होते. सरफराज यांना रिव्हर्स स्विंगचा राजा म्हटलं जात होतं. कसोटी क्रिकेटमध्ये 177 विकेट घेणारे सरफराजनंतर खासदार झाले.