जळगाव : पंचायत समितीच्या माजी सभापतीचा गळा चिरून खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची मंगळवारी रात्री अज्ञाताने गळा चिरून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कुर्‍हा येथील गोसावी पेट्रोलपंपाच्या परिसरामध्ये डी.ओ. पाटील यांची हत्या करण्यात आली. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घटना उघडकीस आल्यानंतर जवळपास दोन ते तीन हजार नागरिकांचा जमाव या परिसरात जमला होता.

मुक्ताईनगर पंचायत समितीला माजी सभापती म्हणून डी.ओ. पाटील यांनी काम पाहिले होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. काल मध्यरात्राी त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला. त्यानंतर आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घटनास्थळावर पोलिसांचे श्वानपथक दाखल झाले.

शान पथकाने पेट्रोल पंपासमोर असलेल्या नाल्यापर्यंत माग दाखवला आहे. पाटील यांच्याबद्दल मारेकर्‍यांना याची माहिती असावी व त्यातूनच हा खून नियोजनबद्ध रित्या केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सकाळी सहा वाजल्यापासून मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक कैलास भारसके तसेच पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे हे घटनास्थळावर हजर झाले आहेत.