देशातील ‘या’ मोठ्या नेत्याला अन् त्यांच्या पत्नीला ‘कोरोना’चा संसर्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पण रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामध्ये अनेक नेते मंडळींना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आता देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांच्या पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

भारतात वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेची बाब बनत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अशा सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत. मात्र, तरीही नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच आता माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्यासह त्यांच्या पत्नीला कोरोना व्हायसरचा संसर्ग झाला आहे. देवेगौडा यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘माझी पत्नी चेन्नम्मा आणि माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही स्वत:ला कुटुंबातील सदस्यांसह आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जे कोणी माझ्या संपर्कात होते, त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच माझ्या पक्षातील कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी घाबरू नये, अशी विनंती मी करतो’.

दरम्यान, आत्तापर्यंत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह क्रिकेटर सचिन तेंडूलकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.