एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांनी राफेल खरेदीतील भ्रष्टाचाराचा निषेध करून भाजपला सोडचिट्टी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रविंद्र आंग्रे यांनी आज (मंगळवार) गांधीभवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.

रविंद्र आंग्रे यांनी ठाणे येथे गुन्हे शाखा व खंडणी विरोधी पथकात कार्यरत असताना ठाणे जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारी एकहाती मोडून काढली होती. मोदी सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा करून सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळेच आपण भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असे रविंद्र आंग्रे म्हणाले.

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात केला. अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी फक्त काँग्रेस पक्षच काम करत आहे. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असे मुनाफ हकीम म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. विविध पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढत चालला आहे. त्यामुळे राजकीय वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत हे स्पष्ट होते असे खासदार अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.