UP मधील महंत बरळले, म्हणाले – ‘अब्दुल कलाम जिहादी, त्यांनी पाकिस्तानला अणुबॉम्बची माहिती दिली’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. कलाम यांच्याबद्दल गाझियाबादमधील डासना देवी मंदिराचे पुजारी नरसिंहानंद सरस्वती यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अब्दुल कलाम हे जिहादी होते, त्यांनी डीआरडीओ प्रमुख असताना पाकिस्तानला अणुबॉम्ब निर्मितीसंदर्भातील माहिती दिल्याचा आरोप सरस्वती यांनी केला आहे. तसेच देशातील सन्माननीय कुटुंबांतील कोणतेही मुस्लीम हे कधीच भारत समर्थक असू शकत नाहीत, असे धक्कदायक विधान सरस्वती यांनी केले आहे.

राष्ट्रपती भवनामध्ये अब्दुल कलाम यांनी मुस्लिमांसाठी एक विशेष विभाग देखील तयार केल्याचा दावा नरसिंहानंद सरस्वती यांनी केला आहे. जिथे कोणतीही मुस्लीम व्यक्ती आपली तक्रार दाखल करू शकत होता असे त्यांनी म्हटल आहे. गाझियाबादमध्ये काही दिवसांपूर्वी मंदिरामध्ये पाणी प्यायल्याने एका मुस्लीम तरुणाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्याच मंदिरात नरसिंहानंद हे पुजारी आहेत. मुस्लीम तरुणाला मारहाणीच्या घटनेनंतर शिरांगी नंद यादव या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. सोशल नेटवर्किंगवर या मुस्लीम तरुणाला पाणी पिण्यावरुन मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा वाद शांत होत नाही तोच आता पुजाऱ्यांनी अब्दुल कलमांसंदर्भात केलेल्या विधानामुळे मंदीर पुन्हा वादात सापडले आहे. याबाबत एका हिंदी वेबसाईटने वृत्त दिले आहे.