प्रणव मुखर्जी पंचतत्वात विलीन, कृतज्ञ होत देशानं साश्रूंनी दिला अखेरचा निरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय इतमामात लोधी स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव आर्मी हॉस्पिटल मधून 10, राजाजी मार्गावर असणाऱ्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणण्यात आलं होतं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या घरी श्रद्धांजली अर्पण केली. देशाच्या 13 व्या राष्ट्रपतींचे पार्थिव सकाळी 9.30 वाजता आर अँड आर हॉस्पिटलमधून आणण्यात आलं आणि दुपारी 2 वाजता लोधी स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशेष म्हणजे प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह होते त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी खूप कमी लोक उपस्थित होते. सर्व उपस्थित लोक पीपीई किट घालून होते. त्यांचा मुलगा अभिजित मुखर्जी यांनी वडील प्रणव मुखर्जींना अग्नी दिला. प्रणवदांवर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, सिडीएस बिपीन रावत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंदीय मंत्री हर्षवर्धन, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर, अधीर रंजन चौधरी, सिपीआय महासचिव डी राजा, अरविंद केजरीवाल अशा अनेकांनी दिवंगत राष्ट्रपतींना श्रद्धांजली अर्पण केली.

84 वर्षीय असलेले प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले होते. दीर्घ काळ राजकारणात सक्रिय असलेले काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना 10 ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्रेन सर्जरी नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती आणि त्यांची कोरोना चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.

प्रणव मुखर्जी 2012 ते 2017 या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते. त्यांना 2019 मध्ये भारतरत्न आणि 2008 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. सोबतच पश्चिम बंगाल सरकारने देखील दुखवटा जाहीर केला आहे.