प्रणव मुखर्जी यांचं हेल्थ अपडेट हॉस्पीटलनं केलं जारी, अद्यापही कोमामध्येच आहेत माजी राष्ट्रपती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अजूनही कोमामध्ये असून जीवनरक्षण प्रणालीवरच आहेत. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पीटलने ही माहिती दिली. 84 वर्षीय मुखर्जी यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. माजी राष्ट्रपतींना 10 ऑगस्टला या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यांची मेंदूची सर्जरी करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या फुफ्फुसांमध्ये सुद्धा संसर्ग झाला आणि त्यावर सुद्धा उपचार सुरू आहे.

हॉस्पीटलने सांगितले की, मुखर्जी यांना जेव्हा भरती करण्यात आले होते, तेव्हाच कोविड-19 चाचणीत ते संक्रमित असल्याचे आढळून आले होते. हॉस्पीटलीने एका वक्तव्यात म्हटले, प्रणव मुखर्जी यांच्यावर फुफ्फुसांच्या संसर्गाचे उपचार सुरू आहेत. कालपासून त्यांच्या मुत्रपिंडामध्ये सुद्धा थोडी समस्या दिसून येत आहे. ते अजूनही दिर्घ कोमामध्ये आहेत आणि जीवनरक्षक प्रणालीवर आहेत. मुखर्जी 2012 ते 2017 पर्यंत देशाचे राष्ट्रपती होते.

मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने ऑपरेशन
मुखर्जी यांच्या मेंदुत रक्ताच्या गाठी झाल्याने नंतर त्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. हॉस्पीटलमध्ये दाखल करताना ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. यांनतर त्यांना श्वासाच्या संबंधी संसर्ग झाला होता.