माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना टेस्ट करण्यासाठी सांगितलं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना व्हायरस झाला असून त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी दुपारी प्रणव मुखर्जी यांनी ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे की, हॉस्पीटलमध्ये दाखल होणं ही एक प्रक्रिया असून मी कोरोना पॉझिटिव्ह आहे.

मुखर्जी यांनी ट्विटमध्ये पुढं सांगितलं की, गेल्या आठवडयाभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी तसेच स्वतः आयसोलेट व्हावं.

प्रणव मुखर्जी यांचं वय आता 84 वर्ष आहे. वाढत्या वयामुळं देखील त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काँग्रेसचे दिग्गज नेता म्हणून राजकीय प्रवास करणारे मुखर्जी हे 2012 ते 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती होते. सन 2019 मध्ये केंद्र सरकारनं प्रणव मुखर्जी यांना भारत रत्न प्रदान करून सन्मानित केलं होतं.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वेगानं वाढतो आहे. आतापर्यंत अनेक राजकीय दिग्गज तसेच सत्ताधारी नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना देखील गेल्या काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांना मेदांता रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गृह मंत्री अमित शहा यांच्याशिवाय अर्जुन मेघवाल आणि इतर काही केंद्रीय मंत्र्यांना देखील कोरोना झाला आहे. अनेक राज्याच्या मंत्र्यांना देखील कोरोनाचं संक्रमण झालं आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देखील कोरोना झाला होता. काही दिवस हॉस्पीटलमध्ये राहिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.