माजी रणजीपटू शेखर गवळी ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळले, युद्धपातळीवर शोध कार्य सुरू

नाशिक : महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि माजी रणजीपटू शेखर गवळी २०० फूट खोल दरीत कोसळले. इगतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी गेले असता ट्रेकिंगदरम्यान ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, अंधार असल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. आज पुन्हा शोध कार्यास सुरुवात झाली आहे.

क्रिकेट विश्वात यांची वेगळीच ओळख आहे. माजी रणजीपटू म्हणून त्यांना ओळखले जातात. ते काल (१ सप्टें) इगतपुरीत पर्यटनासाठी गेले होते. त्यांना ट्रेकिंग, योगा, फिटनेस, व्यायामाचा छंद आहे. काही मित्रांसह इगतपुरीजवळच्या एका डोंगररांगेत ट्रेकिंगसाठी गेलेले होते. दरम्यान, त्यांचा तोल गेला आणि ते २०० फूट खोल दरीत कोसळले.

घटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह तातडीने शोध कार्य सुरू केले. परंतु त्यांचा शोध घेण्यात यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. गर्द अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबवून पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. या घटनेमुळे राज्यभरातील क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे.