‘कंधार’ प्रकरणात महत्वाची भूमिका पार पाडणार्‍या माजी रॉ प्रमुखांनी फारूक अब्दुल्लांच्या सुटकेबाबत केला मोठा ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर नजरकैदेत असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांना आता सोडविण्यात आले आहे. फारूक अब्दुल्ला यांना अश्याप्रकारे अचानक सोडल्यामुळे प्रत्येकजण आश्चर्यचकित आहे. या सर्वांच्या दरम्यान आयबीचे विशेष संचालक आणि रॉचे माजी प्रमुख एएस दुलत यांनी फारूक अब्दुल्ला यांच्या सुटकेविषयी मोठा खुलासा केला आहे. दुलत यांच्या म्हणण्यानुसार ते स्वत: फारुख अब्दुल्ला यांना भेटले, त्यानंतर केंद्र सरकारमधून त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुलत यांनी दावा केला की, भेटी दरम्यान फारूक यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते आणि त्यांचा मुलगा मुळीच देशाविरूद्ध नाहीत.

दुलत यांनी सांगितले की, ते नुकतेच काश्मीरच्या दौऱ्यावर गेले असता त्यांना तेथे विशेष मोहिमेसाठी पाठविण्यात आले होते. ज्या मिशनचे नाव ‘मिशन फारूक’ आहे. काश्मीर भेटीदरम्यान त्यांनी फारुक अब्दुल्ला यांची भेट घेतली आणि याची माहिती त्यांनी एनएसए अजित डोवाल आणि पंतप्रधान कार्यालयालाही दिली. ते म्हणाले की, जेव्हा मी अब्दुल्लांना भेटलो तेव्हा ते खूप थकल्यासारखे दिसत होते आणि त्यांची तब्येतही ठीक दिसत नव्हती. आपण भारतासाठी पूर्ण वचनबद्ध असल्याचे फारूक यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, एएस दुलत यांना काश्मीरवरील जुना तज्ञ म्हणतात. १९९९ मध्ये कंधार प्रकरणात दुलत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच, १९९९ मध्ये दहशतवादी संघटना हरकत उल मुजाहिद्दीनने भारतीय विमान आयसी ८१४ चे अपहरण केले होते. या विमानात १७६ प्रवासी आणि १७ चालक दल सदस्य होते. कंधार प्रकरणाशिवाय दुलत यांनी रुबिया अपहरण प्रकरणातही मध्यस्थी केली होती.

गृह मंत्रालयाकडून दुलत यांना काश्मीर दौर्‍यासाठी परवानगी :
दुलत म्हणाले की, आपल्या गुप्त मोहिमेवरुन परतल्यावर महिनाभरानंतरच फारुख अब्दुल्ला यांना पंतप्रधान कार्यालयातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. दुलत यांनी सांगितले कि, त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फारूक अब्दुल्ला यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यानंतर गृहमंत्रालयाने त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर ९ फेब्रुवारी रोजी त्यांना गृह मंत्रालयाचा फोन आला की, आपण काश्मीरला जाऊ शकता. यावेळी त्यांनी फारूक अब्दुल्ला यांची भेट घेतली. परत आल्यानंतर त्यांना गृहमंत्रालयाचा फोन आला आणि बैठक कशी झाली, असे विचारले गेले.

You might also like