शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखाची गोळया झाडून निर्घृण हत्या, प्रचंड खळबळ

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील रामपूर येथील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनुराग शर्मा यांची हत्या करण्यात आली. मारेकर्‍यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून ते पसार झाले. शहरातील सिव्हिल लाइन परिसरातील आगापूर भागात ही घटना घडली आहे. शर्मा यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होतेे. मात्रा त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेनंतर अनुराग शर्मा यांचे समर्थक संतापले असून त्यांनी जिल्हा हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. परिस्थिती गंभीर झाल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि स्टाफने जीव वाचवण्यालाठी तेथून पळ काढला. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनुराग शर्मा यांची पत्नी शालिनी शर्मा या भाजपच्या नगरसेविका आहेत. घटनेनंतर भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस महासंचालक रमित शर्मा रामपूर येथे पोहोचले आहेत. रमित शर्मा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ज्वालानगरात राहाणारे अनुराग शर्मा भाजीपाला घेऊन स्कूटीने घरी जात होते. त्यांच्या मागून दुचाकीवर आलेल्या दोन मारेकर्‍यांनी अनुराग शर्मा यांच्यावर खुलेआम गोळी झाडली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे.