मालेगाव गोळीबार प्रकरणात माजी स्थायी समिती सभापतीला अटक

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन  – माजी नगरसेवक प्रा़ रिजवान खान यांच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा माजी आमदार आसिफ शेख यांचे काका आणि माजी स्थायी समिती सभापती खलील शेख यांना अटक केली आहे.

माजी नगरसेवक प्रा. रिजवान खान यांच्या घरावर २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोघा जणांनी गोळीबार केला होता. त्यातून खान हे थोडक्यात बचावले होते. याप्रकरणी पोलिसांनी इम्रान खालीद शेख ऊर्फ इम्रान बाचक्या, इरफान इस्माईल सैय्यद व अशपाक शहा यांना अटक केली होती. या तिघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

या कारवाईबाबत आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी असमाधान व्यक्त केले होते. या मागील सुत्रधाराला अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर पोलिसांनी शेख खलील शेख शफी (वय ५३, रा. हजारखोली) यांना बुधवारी रात्री अटक केली आहे. मात्र, या गोळीबारात त्यांचे नेमका काय रोल आहे, याची माहिती अद्याप उघड केलेली नाही.