माजी राज्य निवडणूक आयुक्त ‘नीला सत्यनारायण’ यांचे ‘कोरोना’मुळे निधन

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. त्यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता. दरम्यान, त्यांनी या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

नीला सत्यनारायण या राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त होत्या. नीला सत्यनारायण यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1949 रोजी झाला होता. 1972 च्या बॅचच्या सनदी अधिकारी (सेवानिवृत्त) असलेल्या नीला सत्यनारायण यांनी प्रशासनात विविध पदांवर काम पाहिले होते.

नीला सत्यनारायण यांना साहित्याची देखील आवड होती. त्यांनी प्रशासकीय सेवेबरोबरच साहित्याच्या क्षेत्रात देखील आपला ठसा उमटविला होता. नीला सत्यनारायण यांनी जवळपास दीडशे कविता लिहिल्या. विशेष म्हणजे काही मराठी आणि हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या एका कथेवर आधारित बाबांची शाळा हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता.