अपहरण, खंडणी प्रकरणात तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP) दोषी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचे अपहरण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार व धीरज यशवंत येवले या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी १६ रोजी दोषी ठरविले आहे. तसेच या प्रकरणातील तिसरे आरोपी चाळीसगावचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू असून १९ जानेवारी रोजी शिक्षेवर कामकाज होणार आहे.

चाळीसगाव येथील रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अप्पर पोलिस अधीक्षक मनोज लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. ही घटना ३० जून २००९ रोजी चाळीसगाव येथे घडली होती. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर २०१२ मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज चालवले तर लोहार यांच्यावतीने अ‍ॅड.निलेश घाणेकर (औरंगाबाद) व अ‍ॅड.सुधीर कुळकर्णी (जळगाव) यांनी, विश्वास निंबाळकर यांच्यावतीने अ‍ॅड.आर.के.पाटील, धीरज येवले यांच्यावतीने अ‍ॅड.सागर चित्रे, मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड.पंकज अत्रे व अ‍ॅड.अविनाश पाटील यांनी काम पाहिले.