स्वतंत्र तेलंगणा चळवळीचे नेते अन् माजी गृहमंत्री नरसिम्हा रेड्डी यांचे निधन

हैद्राबाद : वृत्तसंस्था –  तेलंगणा( Telangana) राष्ट्र समितीचे ज्येष्ठ नेते आणि तेलंगणाचे माजी गृहमंत्री नरसिम्हा रेड्डी ( Narsimha Reddy ) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून रेड्डी यांना कोरोनाची ( Corona) लागण झाली होती. त्यानंतर फुफ्फुसातील रोगाचे निदान करण्यासाठी त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. २०१४ मध्ये तेलंगणा राज्य निर्मित्तीनंतर राज्याचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी तेलंगणाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले होते.

नरसिम्हा रेड्डी यांनी तेलंगणा राज्य निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर हैदराबादमधील कामगार संघटनांचे जेष्ठ नेते म्हणून देखील काम करत होते. अविभाज्य आंध्र प्रदेशमधील विधानसभेत ते तीन वेळा आमदार बनून निवडून आले होते. 1978, 1985 आणि 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २००४ मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीने काँग्रेसमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्यांनी दिवंगत वायएसआर रेड्डी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले होते.रेड्डी यांची तब्येत खालावल्यानंतर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( K.Chandrashekhar Rao ) यांनी बुधवारी रात्रीच रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मित्तीसाठी केलेल्या आंदोलनात त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची आठवण करुन देत, सरकारमधील त्यांच्या भूमिकेचीही आठवण करुन दिली. त्याचबरोबर रेड्डी यांच्यावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेशही राव यांनी दिले आहेत.रेड्डी यांच्या निधनानंतर राज्यातील भाजपच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.