‘मोदी सरकार – 1’ चे ‘संकटमोचक’ अरुण जेटली यांचे 66 व्या वर्षी दिल्लीच्या ‘AIIMS’ हॉस्पीटलमध्ये निधन

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षा अखेरचा श्वास घेतला आहे. राजकारणाबरोबरच ज्येष्ठ वकिल, लेखक, आर्थिक विश्लेषक अशा विविध पातळीवर गेली 40 वर्षे काम करत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. मोदी सरकार 1 मध्ये अरुण जेटली यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. जेटलींनी आर्थिक स्तरावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. मोदी सरकार 1 मध्ये त्यांना संकटमोचक म्हणून संबोधले जाते. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा देशाच्या अर्थकारणावर दीर्घकालीन परिणाम झाला. आज शनिवारी त्यांचे निधन झाले.

दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष

अरुण जेटली यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 रोजी नवी दिल्ली येथे महाराज किशन जेटली आणि रेतन प्रभा यांच्या घरी झाला. त्यांचे वडिल वकील होते. अरुण जेटली 1973 साली दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीधर झाले. आपले विधी शिक्षण त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केले. 1974 मध्ये ते दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते. संगीत यांच्याशी त्यांनी 24 मे 1982 विवाह केला. त्यांना रोहन आणि सोनाली असे दोन पुत्र आहेत.

1991 मध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य

वकिली करणारे अरुण जेटली हे 1991 मध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य बनले. त्यांच्यावर 1999च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाने राष्ट्रीय प्रवक्ता ही जबाबदारी सोपविली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात 13 आॅक्टोंबर 1999 रोजी सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. यावेळी त्यांच्याकडे निर्गुंतवणूक खात्याचा कार्यभारही सोपवण्यात आला. जगभरातून देशात गुंतवणूक यावी, यासाठी प्रथमच नवे मंत्रालय बनवण्यात आले. याशिवाय याचा कार्यभारही त्यांच्याकडेच सोपवण्यात आला. 23 जुलै 2000 रोजी त्यांच्याकडे विधी, न्याय आणि कंपनी मंत्रालयाची कॅबिनेट मंत्री म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. यानंतर त्यांच्याकडे विविध खाती येत गेली. यावेळी त्यांनी या सर्व खात्यांना आपापल्या परीने न्याय दिला.

अमृतसरमधून पराभव परंतु अर्थमंत्री

भारतीय जनता पक्षाला 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर त्यांच्याकडे महासचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. ते पुन्हा वकिलीकडे वळले. राज्यसभेवर त्यांची 3 जून 2009 मध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली. ते भाजपाच्या केंद्रीय निवड समितीचे सदस्यही बनले. राज्यसभेत निवडून येणारे जेटली 1980 मध्ये भारतीय जनता पक्षात सहभागी झाले होते. 2014 पर्यंत त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. 2014 मध्ये मात्र त्यांना अमृतसरमधून पक्षाने उमेदवारी दिली. देशभरात मोदी लाट असतानाही अमरिंदर सिंग यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभेत पराभव झाल्यानंतरही मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात कॉपोरेट मंत्रालय आणि सरंक्षणमंत्री म्हणून त्यांचा समावेश केला. त्यानंतर त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपविण्यात आले. यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराने काळा पैसा जमाविणाऱ्यांना एक संधी देत सप्टेंबर 2016 मध्ये बेकायदेशीर उत्पन्न घोषित करण्याची योजना जाहीर केली.

दरम्यान 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशभरात खळबळ उडाली होती. भ्रष्टाचार, काळे धन, बनावट चलन आणि दहशतवादावर अंकुश लावण्यासाठी मोदींनी हा निर्णय घेतला होता. सर्वत्र नोटा बंदी अयशस्वी झाल्याचे सांगितले जात असताना त्याच्या चांगल्या बाजू सांगत त्यांनी समर्थपणे सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. देशभरात उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा त्यांनी नेटाने सामना केला. देशभर पसरलेल्या गोंधळावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी दिवसरात्र प्रयत्न केले.

GST लागू करण्यासाठी मोठे प्रयत्न

नोटा बंदीनंतर मोदी सरकारने घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे जीएसटी लागू करणे. देशभरात जीएसटी लागू करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यात येणाऱ्या अडचणींचा वेळोवेळी आढावा घेऊन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेऊन जीएसटीतील मतभेदांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की, देशभरात जीएसटीची चागंल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात सरकारला यश आले.

प्रकृतीमुळे 2019 ची लोकसभा लढविली नाही

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या अखेरच्या काही महिन्यांमध्ये त्यांना प्रकृतीने साथ दिली नाही. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुक लढविली नाही. इतकेच नाही तर, मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात आपला समावेश करु नये, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींना केली. त्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात वकिली केली. जेटली जरी भाजपाचे नेते असले तरी वकिली करताना मात्र त्यांचे पक्षकार हे सर्व पक्षातील होते. काँग्रेसचे माधवराव सिंधिया, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह जनता दलाचे शरद यादव यांची त्यांनी विविध न्यायालयात बाजू मांडली आहे. क्रिकेटमध्येही रुची असणारे जेटली बीसीसीआयचे उपाध्यक्ष राहिले आहेत. राजकारण, कायदा या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. भाजपाची राष्ट्रीय पातळीवर बाजू मांडण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच त्यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी रुग्णालयात धाव घेऊन त्यांची विचारपूस केली होती़.

9 ऑगस्ट रोजी रुग्णलयात दाखल

अरुण जेटली यांची प्रकृती खालावल्याने ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीच्या ‘एम्स’ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी त्यांची तात्काळ भेट घेतली. उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील एम्समध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील अरूण जेटली यांना भेटण्यासाठी रुग्णलयात आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, राज्यमंत्री अश्विनी चोबे हेही उपस्थित होते. इतकेच नाही तर भाजपाच्या इतर दिग्गज नेत्यांनी देखील त्यांची एम्समध्ये जाऊन भेट घेतली. जेटलींची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.