भाजपमधून आऊट गोइंग सुरू ? खडसेंनंतर दुसरा मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याची पक्षाला सोडचिठ्ठी !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दिग्गज नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आणखी एका ज्येष्ठ नेत्यानं भाजपला सोडचिठ्ठी दिली असून आता पक्षातून आऊट गोइंग सुरू झाली की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तूळात आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भाजपमध्ये सक्रिय होते. ते संघाच्या मुशीतून घडलेले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी मराठवाडयात भाजपचा विस्तार केला. बीड लोकसभा मतदारसंघातून ते 3 वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले होते. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून देखील त्यांनी 2 वेळा यश प्राप्त केले होते. राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद देखील त्यांच्याकडे होते. केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षण व खाण राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. गायकवाड हे सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. पण, गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाहेर फेकेले गेले होते.

गायकवाड यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन्ट्री केली होती. एनसीपीच्या तिकीटावर ते खासदार म्हणून निवडून देखील आले होते. मात्र त्यांनी पुन्हा घरवापसी केली. पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नसून काम देखील दिलं जात नाही असा त्यांनी आरोप केला आहे. त्याच नाराजीतून पक्ष सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघत्ततून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. आज दुपारी ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.

एकनाथ खडसेंच्या सोडचिठ्ठीनंतर भाजपमधून आऊट गोइंग सुरू होणार असा कयास बांधला जात होता. जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्याकडे त्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. गायकवाड हे पुन्हा एकदा त्यांच्या मनगटावर घडयाळ बांधतात की अन्य इतर कोणत्या पक्षाची साथ देतात याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, भाजपला त्यांनी रामराम ठोकल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.