संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन

घाना  : वृत्तसंस्था

संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. १९६२ ते १९७४ आणि १९७४ ते २००६ इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते. ८ एप्रिल १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला. गोल्ड कोस्ट म्हणजेच आत्ताचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला. १९९७ मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समुहाची स्थापना केली होती. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

कोफी अन्नान यांना २००१ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. १९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी WHO या संस्थेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरु केले. तिथे ते ३ वर्षे कार्यरत होते. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले.कोफी अन्नान यांनी जागतिक स्तरावर शांतता कशी प्रस्थापित होईल यावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यासाठी आपले आयुष्य वेचले. तसेच गरीबीचे उच्चाटन कसे करता येईल, गरीब जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यादृष्टीनेही समाजकार्य केले.