सिंहगडावरून मुख्यमंत्र्यांच्या पुतळयाचा ‘कडेलोट’ ! दूर्गप्रेमींनी नोंदवला ‘निषेध’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकिल्ल्यांच्या बाबत जाहीर केलेल्या निर्णयावर राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अशातच एका दुर्गप्रेमी असलेल्या तरुणीने सिंहगड किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट करून त्याचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.

पूजा झोळे असे या तरुणीचे नाव आहे. ती मूळची करमाळ्याची असून पुण्यात शिक्षण घेत आहे. पूजा अनेक सामाजिक, राजकीय गोष्टीवर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असते. या व्हिडीओद्वारे पूजाने राज्य शासनाने घेतलेल्या गड किल्ले भाडे तत्वावर देण्याच्या निर्णयाचा जोरदार निषेध केला आहे.

फडणवीस साहेब आपल्याला बायका नाचवायच्या असतील तर वर्षा बंगल्यावर आणि शनिवारवाड्यावर नाचवा अशा शब्दात तरुणीने सरकारविरोधी आपल्या भावना व्यक्त करत सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा ६ जून २०१६ रोजीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात स्वतः त्यांनी असे म्हंटले होते की माझ्याकडून काही चूक झाल्यास माझा रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट करा. त्याच वक्तव्याचे पालन करत या गडप्रेमीने मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचा कडेलोट केला आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून पूजाने गडकिल्ल्यांचे महत्व सांगितले आहे. ती म्हणते, आमच्या किल्ल्यावर होतात ती फक्त युद्धे, अशी युद्धे ज्यांचा इतिहास रचला जातो आणि असा इतिहास आम्ही अभिमानाने सांगतो. त्याचप्रमाणे पूजा ने मुख्यमंत्र्यांना या व्हिडिओतून सर्व शिवप्रेमींची माफी मागत हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले होते. शिवरायांच्या काळात अपराध करणाऱ्याला दंड देण्यासाठी त्याचा कडेलोट करायचे मात्र आज या सिंहगडावरून तुमच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा मी कडेलोट करते असे म्हणत पूजा हातातील पुतळा खाली फेकून देताना व्हिडिओमध्ये दिसते.

आरोग्यविषयक वृत्त –