एक्सप्रेस वेवर २४ वेळा स्पीड लिमिटचे उल्लंघन करणाऱ्या फॉर्चूनर वाल्याला हवालदाराने शिकवला २४ हजारांचा धडा

पुणे : पोलीनसामा ऑनलाईन – वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर आकारण्यात आलेल्या दंडाकडे दूर्लक्ष करणार्‍यांनी आता कितीही दूर्लक्ष केले तरी ते पोलिसांच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. कारण वाहतुक पोलिसांनी पेंडींग दंडाची रक्कम वसूलीसाठी पीटीपी नाकाबंदी मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेतच लष्कर वाहतुक विभागाच्या कर्मचाऱ्याने एका फॉर्चूनर गाडी चालकाकडून पेंडींग असलेला तब्बल २४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे दंडाकडे दूर्लक्ष करत तो न भरणे त्याला चांगलेच महागात पडले आहे.

पुणे शहरात वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यावर ऑनलाईन चालान तयार करण्याची यंत्रणा वाहतुक शाखेच्या पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे. मोबाईलवर या चालानची ई रिसिप्ट तुम्हाला मिळते. त्यानंतर ही रक्कम कुठल्याही चौकातील पोलीस कर्मचाऱ्याकडील ई चालान मशीनद्वारे भरता येऊ शकते. सीसीटिव्हीद्वारेही शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. मात्र या दंडाकडे दूर्लक्ष करणाऱ्यांचा लाखोंचा दंड सध्या पेंडींग आहे. त्यामुळे तो वसूल करण्यासाठी पोलिसांनी पुणे ट्राफिक पोलीस (पीटीपी) नाकाबंदी सुरु केली आहे.

काय आहे पीटीपी नाकाबंदी

दंड आकारण्यात आल्यानंतर कित्येक दिवस तो न भरणा करता पुन्हा पुन्हा वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्याचा दंड तसाच वाढत राहतो. परंतु तो दंड भरत नाही. त्यामुळे दंड पेंडींग राहतो. याची तपासणी करण्यासाठी व वसूली करण्यासाठी पीटीपी नाकाबंदी सुरु करण्यात आली आहे. पीटीपी म्हणजे पुणे ट्रॅफीक पोलीस नाकाबंदी मोहिमेत चौकांमध्ये नाकाबंदी करून ई चलान मशीनवर वाहनचालकांकडील थकीत दंडाची रक्कम तपासली जाते. त्यानंतर त्याने ती रक्कम भरली नसल्यास त्याच्याकडून वसूल केली जाते.

आणि पोलीस हवालदार जगताप यांनी वसूल केला २४ हजारांचा दंड

लष्कर वाहतुक विभागाकडून पीटीपी नाकाबंदी करण्यात येत आहे. त्यावेळी गुरुवारी दुपारी नेहरू मेमोरीयल हॉलजवळ पोलीस हवालदार मार्तंड जगताप यांनी एका फॉर्चूनर चालकाला थांबवले. तेव्हा ई चालन मशीनमध्ये त्याचा दंड तपासल्यावर त्याच्यावर तब्बल २४ हजार २०० रुपयांचा दंड आकरण्यात आला होता. त्याने यापुर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तब्बल २४ वेळा स्पीड लिमीटचे उल्लंघन केले होते. त्याच दंड काल जगताप यांनी त्याच्याकडून वसूल केला.

पोलीस आयुक्तांनी केले ट्वीट करून अभिनंदन

पोलीस हवालदार जगताप यांनी केलेल्या या कारवाईचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी ट्वीटरवरून अभिनंदन केले आहे. एप्रिल महिन्यात जवळपास ५५ टक्के अपघाती मृत्यूचे प्रमाण पुण्यात कमी झाले आहे. त्यामुळे नियमांचे पालन करूया आणि अपघातांचे प्रमाण कमी करूयात असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.