धक्‍कादायक ! तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेलेल्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डांबून ठेवून मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या तरुणाचा दुसऱ्या दिवशी दुपारी मृतदेह सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी हिंजवडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

कुमार तानाजी कसबे (वय २८, रा. कोळेकर निवास, म्हाळुंगे) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी राकेश (रा. बाणेर) व त्याच्या साथीदारांविरुद्ध अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा व खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी राणी कुमार कसबे (वय २५, रा. म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कुमार कसबे हे २० जुलै रोजी ९ वाजता मोटारसायकल घेऊन कोठेतरी गेले होते. ते रात्री परत आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी २१ जुलैला दुपारी ३ वाजता घरी परतले. तेव्हा त्यांच्या पत्नीने विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, बाणेर येथील राकेश व त्यांची भांडणे झाली. त्याने व त्याच्या मित्रांनी मला मारहाण केली. मला रात्रभर डांबून ठेवले होते. माझ्या डोक्यात मुंग्या येत आहे. मी त्यांची तक्रार करायला पोलिसांकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर कुमार हे आंघोळ करुन पत्नीकडून चिकन आणण्यासाठी ५०० रुपये घेऊन दुपारी साडेचार वाजता घरातून बाहेर पडले. ते रात्रभर घरी परत आलेच नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २२ जुलैला म्हाळुंगे येथील स्कायबे सोसायटीसमोर त्यांचा मृतदेह आढळून आला.

राकेश व त्याच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीमुळेच त्यांना मृत्यु आल्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सावकारीतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पैसे देत नसल्याचे राकेश व इतरांनी कुमार यांचे अपहरण करुन त्याला मारहाण करुन नंतर सोडून दिले होते. पण त्याने पैसे न दिल्याने त्याला पुन्हा पकडून मारले असल्याचा संशय आहे.

आरोग्यविषयक वृत्त –