TRP Scam : अर्णब गोस्वामी यांच्यावर ‘या’ तारखेनंतर कारवाईची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. १५ जानेवारीनंतर त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.’टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांना आता ठोस पुरावे मिळाले आहे. अर्णब गोस्वामी यांच्याविषयी कठोर कारवाई तूर्तास न करण्याची आमची ग्वाही आणखी पुढे सुरू ठेवू इच्छित नाही, असे म्हणणे आज मुंबई पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मुंबई हायकोर्टात मांडले आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे नाव टीआरपी घोटाळ्यात पुढे आल्यानंतर पोलिसांचा वेगाने तपास सुरू आहे. या घोटाळ्यात अर्णब यांचा समावेश असल्याचे काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळेच अर्णब यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. कारवाईबाबत तसे स्पष्ट संकेतच पोलिसांकडून कोर्टात देण्यात आले आहेत. आज याप्रकरणी सुनावणी झाली असता अर्णब यांच्यावरील कठोर कारवाई फार काळ थांबवता येणार नाही, असेच सांगण्याचा प्रयत्न पोलिसांचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. मात्र, आज कोर्टात कोणताही युक्तिवाद झाला नाही.

Advt.

अर्णब गोस्वामी यांच्यातर्फे कोर्टात बाजू मांडणार असणारे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी काही अपरिहार्य कौटुंबिक कारणामुळे आज युक्तिवाद करण्यास उपलब्ध नव्हते. ती बाब कोर्टापुढे ठेवत पुढची तारीख द्यावी आणि तोपर्यंत अर्णब यांना अंतरिम संरक्षण कायम ठेवावे, अशी विनंती वकील निरंजन मुंदरगी यांनी कोर्टाकडे केली. ही विनंती मान्य करत हायकोर्टाने याप्रकरणी १५ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. यावर केवळ तोपर्यंतच (१५ जानेवारी) कठोर कारवाई न करण्याची ग्वाही कायम ठेवण्याची तयारी सिब्बल यांनी दर्शवली.

पोलिसांचे हे म्हणणे नोंदीवर घेऊन हायकोर्टाने सुनावणीची पुढील तारीख दिली आहे. दरम्यान, काही टीव्ही वाहिन्या जाहिरातींतून अधिक महसूल कमावण्यासाठी टीआरपी मध्ये फेरफार करत आहेत, अशी तक्रार ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC) कडून करण्यात आले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला असता टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता. याप्रकरणी बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक झाल्यानंतर महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून अर्णब यांच्या अडचणीही त्यामुळेच वाढल्या असल्याचे दिसत आहे.