जयहिंद स्कूलचे संस्थापक मुख्याध्यापक बी. एफ. खिलनानी यांचे निधन

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाइन

पिंपरीच्या जय हिंद हाय स्कूलचे संस्थापक मुख्याध्यापक भगवान खिलनानी (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. प्रसिद्ध दिवंगत पत्रकार रुप कर्नानी हे त्यांचे भाचे होत. बी. एफ. खिलनानी हे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी एका लहानशा शेडमध्ये जय हिंद हाय स्कूल ही शाळा स्थापन करुन २५ वर्षे तेथे सेवा बजावली. त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षकासाठीचा राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला होता. ते निवृत्त होईपर्यंत या शाळेचा इतका अभिमानास्पद विस्तार झाला, की ती पिंपरीमधील सर्वांत मोठ्या शाळांपैकी आणि महाविद्यालयांतील ठरली.

भगवान खिलनानी शाळेत कार्यरत असताना त्यांनी आपले सर्व आयुष्य शाळेला इतके वाहून घेतले होते, की जणू काही त्यांचे लग्न शाळेशीच लागले होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून न पाहता पूर्वायुष्यात ज्यांना वेळ देता आला नाही असे वैयक्तिक छंद जोपासण्याकडे लक्ष दिले. त्यात लेखन, काव्य, चित्रकला, गायन, संगीत रचना, पोस्टाची तिकिटे जमवणे, अर्कचित्रे (कॅरिकेचर्स) काढणे आदींचा समावेश होता. त्यांनी सिंधी व इंग्रजी भाषेत एकामागोमाग एक पुस्तके लिहिण्याचा सपाटा लावला, ज्यात कविता, लघुकथांचा समावेश होता. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन नामवंत व्यक्ती व उद्योगपतींच्या हस्ते रंजक वातावरणात झाले.

पूर्वायुष्यात शिक्षक असलेले भगवान खिलनानी आयुष्याच्या सोनेरी वयात विद्यार्थी बनले. वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी उर्दू भाषा शिकण्यास सुरवात केली. ती आत्मसात केल्यावर त्यांनी दबी चिंगारिया नावाने उर्दू गझलांचे पुस्तक संकलित केले. या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या हस्ते झाले. भगवान खिलनानी उर्दू गझलांचे संकलन करणारे पहिले सिंधी ठरले.

हिंदुस्थान टाइम्सने घेतलेल्या ऑल इंडिया कॅरिकेचर कॉन्टेस्ट या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात लता मंगेशकर यांचे अर्कचित्र रेखाटून देशपातळीवर दुसरे बक्षीस पटकावले. त्यानंतर त्यांनी स्वतः रंगवलेल्या सुमारे ८० चित्रांचा व हास्यचित्रांचा आल्बम संकलित केला. त्यात अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, शाहरुख खान अशा प्रसिद्ध कलाकारांची अर्कचित्रे आहेत. त्यांनी स्वतःची चित्रे, पोस्टाची तिकिटे यांची प्रदर्शने, पुस्तक प्रकाशने असे १५ शानदार कार्यक्रम आयोजित केले.