31 तासांच्या चौकशीनंतर YES बँकेचा संस्थापक राणा कपूरला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येस बँकेचा संस्थापक आणि माजी कार्यकारी अध्यक्ष याची ईडीने तब्बल ३१ तास चौकशी केली. त्यानंतर त्याला पहाटे ४ वाजता अटक केली आहे. मनी लाँड्रिंग अ‍ॅक्टनुसार राणा कपूर याला अटक केली असून रविवारी त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात येईल. कपूर याच्याकडे गेल्या दोन दिवसांपासून चौकशी केली जात आहे. शनिवारी दुपारी कपूर याला बालार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. त्याविरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे तो देश सोडून पळून जाऊ शकत नव्हता. ईडीने दिल्ली व मुंबईतील काही ठिकाणी शनिवारी छापे मारले होते.

राणा कपूर याने डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात त्याच्या पत्नीच्या खात्यात पैसे पाठविले होते. राणा कपूर याने येस बँकेची स्थापना २००४ मध्ये केली आहे. त्यानंतर त्याने जादा व्याजाचे आमिष दाखवून शासकीय संस्था, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा केल्या होत्या. खासगी बँकेत ठेवी ठेवू नयेत, असा आदेश असताना अनेक महापालिकांनी त्याचे उंल्लघन करुन महापालिकेच्या कोट्यवधीचा निधी येस बँकेत ठेव म्हणून ठेवला.

या मागे राणा कपूर याने संबंधितांना आमिषे दाखवून या ठेवी ठेवायला भाग पाडले. त्याने आपल्या संबंधितांना मन मानेल त्याप्रमाणे कर्ज वाटप केले. त्यामुळे २०१७ मध्ये जेव्हा राणा कपूर याने बँकेचा एनपीए ६ हजार ३५५ कोटी रुपये दाखविण्यात आला होता. तेव्हापासूनच बँक अडचणीत येण्यास सुरुवात झाली होती.