४ अनंत गीते तर ३ सुनील तटकरे रायगड लोकसभेच्या रिंगणात

नामसाधर्म्यामुळे फटका बसण्याचा धोका

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री अनंत गिते तर राष्ट्रवादीकडून माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे निवडणूक रिंगणात आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. तर एकूण १४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे दाखल केली.

दरम्यान, अनंत गीते नावाने ४ तर सुनिल तटकरे यांच्या नावाचे ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे नामसाधर्म्याचा नक्की फायदा कुणाला आणि तोटा कुणाला होतो हे पाहणे आता औत्स्युक्याचं ठरणार आहे. शुक्रवारी ५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होऊन अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. या नामसाधर्म्यामुळे मागिल लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना फटका बसला होता.

शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विरुद्ध अनंत पद्मा गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून अनंत गंगाराम गीते (शिवसेना) यांचे आणखी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे अनंत गीते नावाने आता ४ अर्ज दाखल झाले आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्या नावातील साधर्म्य असलेले सुनील सखाराम तटकरे व सुनील पांडुरंग तटकरे या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

दरम्यान, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), संजय अर्जुन घाग (अपक्ष), विलास गजानन सावंत (महाराष्ट्र क्रांती सेना), सचिन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी), गजेंद्र परशुराम तुरबाडकर (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके (भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील (अपक्ष), रामदास दामोदर कदम (अपक्ष), अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष), योगेश दीपक कदम (अपक्ष), गायकवाड अनिल बबन (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.