उस्मानाबादमध्ये गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणार्‍या चौघांना खेडशिवापूरला अटक

Advt.

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  उस्मानाबाद येथे एकावर गोळीबार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर पुण्यात पळून आलेल्या चौघांना राजगड पोलिसांनी अटक केली आहे.

दीपक धनाजी जगताप (वय २६, रा. रांजे, ता. भोर), ऋषिकेश सुनिल रणपिसे (वय २२, रा. रांजे, ता. भोर), यश गणेश देवकर (वय २१, रा. रांजे, ता. भोर) आणि गणेश सुरेश शेळके (वय २१, रा. आर्वी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ पिस्तुल व २ काडतुसे, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

खेड शिवापूर गावाजवळील कोंढणपूर फाटा येथे मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलवर चार संशयित थांबले असल्याची माहिती राजगड पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष तोडकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौघांना घेरुन पकडले व चौकशी सुरु केली. तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देऊन पळून जाऊ लागले. त्यांना पकडताना दीपक जगताप याच्या कमरेला पिस्तुल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याबरोबर चौघांना पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी एकावर गोळीबार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्याची खात्री केली असता बिंबळे पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे आढळून आले. चौघांवरही आर्म अक्टअंतर्गत गुन्हा दाखल करुन राजगड पोलिसांनी अटक केली आहे.