Bhandara News : तुमसर येथे भरदिवसा सराईत गुन्हेगारावर फायरिंग, सराईत गुन्हेगार जखमी

तुमसर/ भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून एका सराईत गुन्हेगारावर भरदिवसा गोळ्या झाडल्याची घटना तुमसर येथील आंबेडकर वॉर्डात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. ही घटना आज (मंगळवार) दुपारी 2.15 वाजता घडली. यामध्ये सराईत गुन्हेगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भंडारा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संतोष चंदन दहाट (वय-28 रा. आंबेडकर वॉर्ड, तुमसर) असे जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दहाट हा दुपारी सव्वादोनच्या सुमारास आंबेडकर वॉर्डात उभारला होता. त्यावेळी तरुणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला करत चार गोळ्या संतोषच्या दिशेने झाडल्या. संतोषने तीन गोळ्या चुकवल्या मात्र, एक गोळी त्याच्या छातीत लागल्याने तो जागेवर कोसळला. तसेच त्याच्या मानेवर चाकूने वार केल्याचे सांगण्यात येत आहे.

गोळीबारीची घटना समजता पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जखमी संतोष याला तात्काळ तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार करुन त्याला पुढील उपचारासाठी भंडारा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.