स्कूल व्हॅनला लागलेल्या आगीत 4 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

पंजाब (चंदीगड) : वृत्तसंस्था – एका खसगी शाळेच्या स्कूल व्हॅनला अचानक लागलेल्या आगीमध्ये स्कूल व्हॅनमधील चार विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना पंजाबच्या संगरुरमध्ये आज (शनिवार) घडली. या घटनेत मृत्यू झालेली मुले 10 ते 12 वर्षे वयोगटातील होते. या मोठ्या दुर्घटनेमुळे खासगी शाळेत विद्यार्थ्यांना ने – आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

लोंगेवाल – सदसमचार रोडवर ही दुर्घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटना घडली त्यावेळी व्हॅनमध्ये 12 विद्यार्थी होते. व्हॅनला आग लागल्याचे दिसताच जवळच्या शेतात काम करणाऱ्यांनी व्हॅनच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी आगीतून 8 मुलांना बाहेर काढले. मात्र, चार विद्यार्थी व्हॅनमध्ये अडकल्याने त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

ही दुर्घटना खासगी शाळेतील मुलांना घरी सोडण्यासाठी जात असताना घडली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. मृत सर्व विद्यार्थी 10 ते 12 वयोगटातील होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.