काँग्रेसला आणखी एक ‘धक्का’ ; ‘हे’ ४ आमदार देखील भाजपच्या वाटेवर ; काँग्रेस आमदाराचा ‘गौप्यस्फोट’

पणजी : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचा विजय झाला. त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये घडामोडींना वेग आला आहे. त्यात आता गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का मिळाला आहे. काँग्रेसचे काही आमदार भाजपप्रवेश करण्याच्या तयारी असल्याची चर्चा गोव्यात सध्या सुरु आहे. कुंकळ्ळी मतदारसंघातील काँग्रेस आमदार क्लाफासियो डायस यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसचे चार आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली आहे. कुंकळ्ळी येथे काल सायंकाळी उशिरा आपल्या समर्थकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःही भाजपप्रवेश करण्यात तयार असल्याचे सांगितलं.

गोव्यात काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या वाटेवर, कुंकळ्ळीच्या काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट

कुंकळ्ळी मतदारसंघात सध्या आपण काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार अशा अफवा उठलेल्या आहेत. अजून तरी आपल्याला भाजपची ऑफर आलेली नाही. पण विरोधात असल्याने आपणाला बेरोजगार युवकांना सरकारी नोकऱ्या मिळवून देणे शक्य नाही. आमचे चार आमदार काँग्रेसचा त्याग करण्याच्या वाटेवर आहेत. आपल्याला लोकांनी परवानगी दिल्यास आपण त्यांच्याबरोबर काँग्रेस सोडण्यास तयार आहे, असं आमदार डायस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.

काँग्रेसचे चार आमदार त्यांच्या मतदारसंघात होत नसलेल्या विकास कामांमुळे अस्वस्थ आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असं डायस यांनी सांगितलं. आपल्या समर्थकांना आपण काँग्रेस पक्ष सोडालेला नको असल्यास आपण त्यांच्या मर्जीबाहेर जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी नमुद केले.

दरम्यान, या बैठकीला यावेळी २०० कार्यकर्ते उपस्थित होते. डायस यांनी भाजप प्रेवशाबाबात बोलल्यानंतर मात्र काही कार्यकर्त्यांनी डायस यांनी भाजपात प्रवेश करू नये, असंच सांगितले, तर काहींनी विकासासाठी हा निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सांगत, डायस यांच्या भाजप प्रवेशाला सहमती दिली. मात्र डायस यांनी यावर समर्थकांचा विचार घेऊनच निर्णय घेऊ, असं सांगितलं.