बसपाच्या चारही नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान केल्याप्रकरणी बसपाच्या चार नगरसेवकांना पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून निलंबित केले आहे. बसपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या निवडणूकीत प्रथमच बसपाने आपले उमेदवार उभे केले होते व ते उमेदवार निवडूनही आले होते. मात्र आता त्या नगरसेवकांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10व मधून बसपाचे चार उमेदवार विजयी झाले होते. यामध्ये प्रभाग क्रमांक 10अ मधून अक्षय उनवणे, 10 ब मधून अश्‍विनी सचिन जाधव, 10 क मधून अनिता पंजाबी ,तर 10 ड मुदस्सर शेख यांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी पक्षाविरोधात जाऊन भाजपला जाहीर पाठींबा दिला.

त्यांच्या समवेत बसपाच्या चार नगरसेवकांनी देखील भाजपाला पाठिंबा दिला होता. मतदान करताना या सर्व नगरसेवकांनी हात उंचावून भाजपला मत असल्याचे जाहीर केले. बहुजन समाज पार्टीने याची गांभीर्याने दखल घेतली असून निवडून आलेल्या चार नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाच्या विरोधात मतदान करून भाजपला साथ दिली म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली’, असे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी आज स्पष्ट केले आहे. या घटनेने नगरच्या राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपाला मतदान केल्याप्रकरणी 18 नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत. या विषयी सात दिवसांमध्ये खुलासा मागविण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेले असून त्यांना लवकरच खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.