नागपुरात ऑक्सिजन अभावी 4 रुग्णांचा मृत्यू, प्रचंड खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून रुग्णालयात रेमडिसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे. परिणामी अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. नागपूरातील कन्हान-कांदरी येथील जवाहरलाल नेहरू रूग्णालयात ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि. 13) पहाटे तीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याचे समोर आले आहे.

नागपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने नागपूरातील वेस्टर्न कोल्ड फील्डच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर केले आहे. या रुग्णालयात 29 रुग्णांवर उपचार सुरू होते. रुग्णालयातील 4 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. दरम्यान वसई-विरार आणि नालासोपारा परिसरातील रुग्णालयांतही ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.