गोळीबार प्रकरणातील चार गुन्हेगार गजाआड

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – दीड महिन्यापूर्वी फलटण तालुक्यातील गुणवरे येथे गुलाब उर्फ गोट्या भंडलकर याच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेत भंडलकर हा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना अटक केली आहे. घटनेनंतर आरोपी दीड महिना फरार होते.

कल्याण गावडे (रा. गुणवरे, ता. फलटण ), अमर धनराज बेंद्रे, वैभव सुर्यभान बेंद्रे (दोघेही रा. सुपे, ता. कर्जत, जि. अहमदनगर), ज्ञानेश्‍वर नारायण साबळे (रा. शिंदा, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दीड महिन्यापूर्वी फलटण-पंढरपूर रस्त्यावरील बरड गावच्या हद्दीत भंडलकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने फलटण येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणात फलटण ग्रामीण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला होता.

सातारा स्थानिक गुन्हे शाखा, फलटण ग्रामीण पोलीस या प्रकरणातील संशयित आरोपींच्या मार्गावर होते. पोलिसांनी आरोपींना अटक करुन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी गोट्याला मारण्यासाठी कल्याण गावडे याच्याकडून १० लाखांची सुपारी घेतल्याचे कबुल केले. कल्याण गावडे व गोट्या उर्फ गोट्या भंडलकर यांच्यात जमिनीवरुन वाद सुरु होता. त्यामुळे जमिनीच्या वादातून नगर जिल्ह्यातील गुंडांना गोट्याला मारण्याची सुपारी दिल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले असून याप्रकरणी पोलीस सखोल तपास करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेनुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सोमनाथ लांडे, पोलीस कर्मचारी मनोज घोरपडे, उत्तम दबडे, विजय शिर्के, संतोष पवार, नितीन घोगावले, प्रवीण फडतरे, मयुर देशमुख यांनी केली.