वाळवामधील हा परिसर सिलेंडरच्या स्फोटाने हादरला , २४ घरे उध्वस्त

वाळवा : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातील वाळव्यामध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला आहे. ही घटना वाळवातील बाराबीगा परिसरात घडली आहे. स्फोटांमुळे आग पसरून 24 शेतमजुरांची राहती घरे जळून खाक झाली आहेत. आगीत सुमारे पन्नास लाखांची हानी झाली आहे. तसेच पाच लाखांची रोकड आणि दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे.

त्यावेळी हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी घटनास्थळाला भेट दिली. आणि नुकसान झालेल्या मजूरांना धीर दिला. शिवाय हुतात्मा साखर कारखान्यातर्फे प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत आणि या मजुरांना कारखान्यातर्फे दोन वेळा जेवण उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. तसेच डाॅ. सुषमा नायकवडी, सरपंच डाॅ. शुभांगी माळी, तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. आगीत नुकसान झालेल्यांना शासनातर्फे सर्व ती मदत देण्यात येईल असे तहसीलदारानी सांगीतले.

वाळवा येथे बाराबीगा वसाहतीत मजूर कुटुंबे राहतात. याठिकाणी सकाळी अचानक आग लागली. त्यानंतर दहा मिनिटात एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्याधडाक्यात शेजारी असलेल्या घरांना आगीचा विळखा पडला. त्यानंतर पाठोपाठ तीन सिलिंडरचे स्फोट झाले. त्यात 24 घरे जळून खाक झालीआहेत. एक म्हैस किरकोळ भाजली आहे. माळभागातील जिगरबाज तरूणानी आगीवर नियंत्रणासाठी मोठे परिश्रम घेतले. तालुका प्रशासनाने तातडीने पंचनामे केले. तर गावातील रेशन दुकानदारांनी आगीत नुकसान झालेल्या व्यक्तींना गहू, तांदूळ वाटप केले.