आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात 4 दिवस संचारबंदी लागू होणार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूरमध्ये नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी 29 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यांदाचा पालखी सोहळा देखील रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपूरात एकत्र येतील. त्यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होऊ शकतो. यामुळे पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी होऊ नये. यासाठी यात्रा भरू न देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.

त्यानुसार भाविकांना पंढरपुरमध्ये न येऊ देण्यासाठी 1500 पोलिसांचा बंदोबस्त जिल्हा व पंढरपूर शहर परिसरात लावण्यात आला आहे. तसेच पंढरपूरकडे येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. याशिवाय पंढरपूर शहर व शहरालगतच्या पाच किलोमीटर परिसरामध्ये संचार बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. मात्र, शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.