पुणे-बंगळुरु महामार्गावरील ‘इनोव्हा-स्विफ्ट’चा भीषण अपघातात 4 ठार, 6 जखमी; मयत कात्रज परिसरातील तर जखमी पुणे जिल्ह्यातील

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-बंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत अटके टप्प्याजवळ आज (रविवार) सायंकाळी सातच्या सुमारास झाला आहे. अपघातात मयत झालेले आणि जखमी हे पुण्यातील असल्याचे समजतय. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन गाड्यांची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यातून बाजूच्या झाडांवर जाऊन आदळल्या.

अपघातामध्ये राहूल प्रल्हाद दोरगे (वय-28) स्वप्नील चंद्रकांत शिंदे (वय-21), रवि साळुंखे (वय समजू शकले नाही, तिघे रा. कात्रज पुणे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर तुषार गावडे (वय-23रा. कात्रज पुणे), आदित्य ओंबासे (वय-16), चंद्रकांत कावरे (वय-17), पूजा ओंबासे (वय-40), भरत ओंबासे (वय-45), सेजल ओंबासे (वय-18 सर्व रा. कलास, ता. इंदापूर, जि. पुणे ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना कृष्णा व सह्यद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याकडे इनोव्हा कार व स्वीफ्ट कार निघाल्या होत्या. दोन्ही गाड्या कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही गाड्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्या. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने कराड येथील रुग्णालयात पाठवले. अपघात स्थळी दोन्ही गाड्यांच्या काचांचा खच पडला आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील सर्व जखमी पुणे व पुणे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.