पुण्याला येणाऱ्या कारचा भीषण अपघात, ४ ठार ३ जखमी

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक जिल्ह्यात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. काल शिरवाडे फाट्याजवळ झालेल्या अपघातात सात जण ठार झाले होते तर ३५ जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज (सोमवार) पहाटे मनमाड-मालेगाव रस्त्यावर कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात ४ ठार तर ३ जखमी झाले आहेत. कारमधील सर्वजण अलाहाबाद येथून पुण्याला येत होते.

मनमाड-मालेगाव रस्त्यावर असलेल्या चोंडी घाटात हा अपघात झाला. चेंडी घाटात ट्रक व अर्टिगा कार यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये ४ जणांचा जगीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत आणि जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत.

चोंडी घाटात झालेल्या अपघातामध्ये २ महिला आणि २ मुलांचा समावेश असून ते अलाहाबाद येथून पुण्याला जात होते. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर पुणे-इंदौर मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.