शेकोटीने घेतला १२ दिवसाच्या बाळासह ४ जणांचा बळी 

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमधील मंडीदीप भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. थंडीपासून वाचवण्यासाठी पेटवण्यात आलेल्या शेकोटीने एकाच कुटुंबातील ४ जणांचा बळी घेतला. मृतांमध्ये २० वर्षांची महिला, तिची १२ दिवसांची नवजात मुलगी, महिलेचा १२ वर्षांचा भाऊ तसेच ४५ वर्षीय आई यांचा समावेश आहे. तर पती बेशुद्धावस्थेत आढळला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळेलेली अधिक माहिती अशी की, भोपाळमधील मंडीदीप भागातील मेगासिटी कॉलनीमध्ये छन्नू (२५) हा त्याच्या पत्नीसह राहत होता. अगदी १२ दिवसांपूर्वीच मुलगी जन्माला आल्यामुळे त्याची सासू आणि मेव्हणा घरी आले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र मंगळवारी सकाळी बराच उशीर झाला तरी छन्नूच्या घराचा दरावजा बंदच होता. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा तोडला तेव्हा घरातील सर्वजण निपचित पडले होते. खोलीतील एका बाजूला कोळशाच्या शेकोटीतून निघणाऱ्या धुरामुळे संपूर्ण खोली भरली होती. पोलिसांनी खोलीतील सर्वांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत छन्नू वगळता इतर चौघांचा मृत्यू झाला होता. कोळसा जळाल्याने विषारी कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होऊन संपूर्ण खोलीत धुर पसरला होता. दरवाजे, खिडक्या बंद असल्याने गुदमरून चौघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र मृतांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.