पुण्यात FTII चे 4 विद्यार्थी बेमुदत उपोषणावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी अन्यायकारक फी वाढीविरूद्ध केलेले आंदोलन देशभर गाजले होते. जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला होता. आता हे लोण पुण्यातही पोहचले आहे. अन्यायकारक, अवाढव्य प्रवेश परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक फी वाढीविरोधात पुण्याच्या एफटीआयआयमधील चार विद्यार्थी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

अवाढव्य प्रवेश परीक्षा शुल्क आणि दरवर्षी वार्षिक शैक्षणिक फीमध्ये होणारी दहा टक्के वाढ यामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. याच असंतोषातून विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण चालू राहील, असा इशारा एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने दिला आहे.

एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने सांगितले की, २०१३ नंतर दरवर्षी शैक्षणिक शुल्कामध्ये दहा टक्के वाढ केली जात आहे. २०१३ बॅचचे वार्षिक शुल्क ५५३८० रुपये होते. तर पुढील २०२० बॅच साठी हेच शुल्क १ लाख १८ हजार ३२० रुपये केले गेले.

मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या या शुल्कवाढीमुळे सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण घेणे अवघड होऊन बसले आहे. २०१८ पासून कोलकाता येथील ‘सत्यजीत रे फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ आणि ‘एफटीआयआय पुणे’ या दोन्ही संस्था संयुक्त प्रवेश प्रक्रिया (जेईटी) घेतात. या प्रवेश परीक्षांचे शुल्क सुद्धा प्रचंड वाढविले आहे. २०१५ मध्ये प्रवेश परीक्षा शुल्क १५०० रुपये होते. आता २०२० प्रवेश परीक्षेसाठी १०,००० शुल्क घेतले जात आहे. या शुल्क वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबातील इच्छुक विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. फी वाढीबाबत विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आवाहन करूनसुद्धा व्यवस्थापनाने कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

या आहेत मागण्या –
* दरवर्षी १० टक्के शैक्षणिक शुल्क वाढ बंद करावी.
* भरमसाठ वाढविलेले शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे.
* प्रवेश परीक्षा शुल्क कमी करावे. तोपर्यंत संयुक्त प्रवेश प्रक्रिया (जेईटी) बंद करावी.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/