४ गॅस सिलेंडरच्या स्फोटात २४ घरे जळून खाक

वाळवा (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील बाराबिगा वसाहतीमध्ये चार गॅस सिलेंडरच्या स्फोटात २४ घरे जळून खाक झाली. या घटनेत काही जनावरे होरपळली असून एका रेडकाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हुतात्मा कारखान्याच्या अग्निशमन दलाची दोन वाहने घटनास्थळी दाखल झाले. ही घटना आज (गुरुवार) घडली.

बाराबिगा वसाहतीतील गंगुबाई प्रकाशे यांच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीचे लोळ उठले. त्यामुळे वस्तीतील इतर घरांनी पेट घेतला. त्यात पांडुरंग डांगे, शंकर करांडे, काकासाहेब लोखंडे, दशरथ करांडे, शिवाजी चिखले यांच्या घरातील गॅस सिलिंडरचेही स्फोट झाले.

वस्तीमधील 24 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. तर घरातील संसारोपयोगी साहित्य, दागिने, रोख रक्कम जळून खाक झाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रशासनानेही पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.